कधीपासूनच मनात होतं ह्याबद्दल काहीतरी व्यक्त करावं. स्वतःच्या देशाबाहेर पडल्याने आपल्या अनुभवविश्वात वृद्धी होते ह्याबद्दल खूप ऐकलं होतं. तशी थोडीफार माझ्याही बाबतीत झाली आहे असं आता मागे वळून पाहताना वाटतं. नवीन माणसं भेटतात, नवीन संस्कृती आणि खानपान, पेहराव सगळंच अनुभवायला मिळतं. एक गोष्टं मात्रं प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जगाच्या पाठीवर दोन टोकांना राहण्याऱ्या आणि कधी नं भेटलेल्या व्यक्तिंच्या स्वभावातील "साम्य "!
एरवी वातावरण, खानपान वगेरे मध्ये इतकी तफावत असतांना माणसांच्या आंतरिक साम्याबद्दल मला भारीच अप्रुप वाटते. कधी कधी एकाच देशात, राज्यात हेच काय पण एकाच घरात देखील व्यक्तींमध्ये मतभेद असतात. मग अश्या इतक्या लांब वसलेल्या ह्या सातासमुद्रापलीकडच्या देशात आपलीशी वाटणारी माणसं कशी दिसतात ?
वंशावलींचा अभ्यास करणाऱ्यांनी ह्याची कारणे शोधून काढली असावीत. वरवर वेगळे दिसणारे आपण सगळे एकाच स्त्रोताने जोडले गेलो आहोत हेही सिद्ध झालं असणार. किंबहुना तश्या documentaries मधून ते बघायलाही मिळतं. पण मग आपल्याला जे साम्य जाणवतं ते प्रत्येक पिढीत झिरपत इथपर्यंत पोचलंय. बराच वेळ मी "साम्य " विषयी बोलतेय पण कशात ते दिसलं हे नमूद नाही केलं. माणुसकी बद्दलच्या संकल्पनांमध्ये असलेलं - साधर्म्य ह्या अर्थाने.
जगभर माझ्यामते माणुसकीची व्याख्या आणि तत्वं ही सारखीच असावित. आपल्या पिलांना पंखाखाली लपवणारी माय तीच असावी, पोराला ठेच लागू नये म्हणून धडपडणारा बापही सारखाच असांवा, मित्रासाठी जान हाझिर म्हणणारा सच्चा मित्रही तसाच असावा. कितीही भांडले तरी जीवाला जीव देणारे भावंडंही तसेच असावे. म्हाताऱ्या किंवा आजारी व्यक्तीविषयीही भावना करुणेची व माणुसकीची असावी. होय नं ? मग असं का होतं की कोणाला समजून घेणं आपल्याला इतकं अवघड जातं? व्यक्तिपरत्वे आपली तत्व का बदलतात? कोणासोबत आयुष्याचे कमी-अधिक वर्ष सोबत घालवल्याने माणुसकीच्या संकल्पना कश्या बदलतात ? नाहीच बदल्यल्या पाहिजेत मुळी. माणसं व्यक्तिगत फायद्यासाठी ह्या तत्वांना पाहिजे तसे वाकवतात. म्हणूनच अश्यावेळी संघर्ष होतात. त्याऐवजी सगळ्यांना माणूसकीच्या चष्म्यातून पहिले तर सगळे सारखेच दिसायला हवेत, बरोबर नं ? तसं होतांना मात्र दिसत नाही.
असो, तर "साम्य " शोधण्याचा माझा छंद मी चालू ठेविन. बघुया माणसं बदलतात, कि त्यांची माणुसकी !
असो, तर "साम्य " शोधण्याचा माझा छंद मी चालू ठेविन. बघुया माणसं बदलतात, कि त्यांची माणुसकी !